राज्यात 60.68 टक्के मतदान, पहिल्या टप्प्यात सर्वाधिक तर 4 चौथ्यात सर्वात कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 10:48 PM2019-04-29T22:48:32+5:302019-04-29T22:50:13+5:30
'लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2019 च्या अनुषंगाने चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात एकूण अंदाजे 56.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मुंबई - राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी आज संपुष्टात आली. त्यामुळे आता मतदारांना केवळ निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्यातील चार टप्प्यातील मतदानाची आज सांगता झाली. चौथ्या टप्प्यात 57 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वात कमी कल्याण मतदारसंघात झाले असून केवळ 44.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद चौथ्या टप्प्यातच झाल्याचे पाहायला मिळाले.
'लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2019 च्या अनुषंगाने चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात एकूण अंदाजे 56.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार मतदारसंघात सर्वाधिक 67.64 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या मावळ आणि शिरुर मतदारसंघात अनुक्रमे 59.12 आणि 59.55 टक्के मतदान झाले. त्यामुळे शहरी भागात मतदारांचा उत्साह ग्रामीण भागातील मतदारांपेक्षा कमीच दिसून आला.
राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचेही कुमार यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघासाठी 63.46 टक्के, दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघांसाठी 62.88 टक्के, तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघांसाठी 62.36 टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 17 मतदारसंघांमध्ये अंदाजे 57 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे सर्वात कमी मतदान चौथ्या टप्प्यातच झाल्याचे पाहायला मिळाले.
चौथ्या टप्प्यातील मतदारसंघ निहाय सायंकाळी 6 वाजेपर्यंतची अंदाजीत मतदानाची टक्केवारी
नंदुरबार - 67.64 टक्के, धुळे - 57.29 टक्के, दिंडोरी – 64.24 टक्के, नाशिक - 55.41 टक्के, पालघर - 64.09 टक्के, भिवंडी – 53.68 टक्के, कल्याण – 44.27 टक्के, ठाणे – 49.95 टक्के, मुंबई उत्तर – 59.32 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 54.71 टक्के, मुंबई उत्तर पूर्व -56.31 टक्के, मुंबई उत्तर मध्य - 52.84 टक्के, मुंबई दक्षिण मध्य – 55.35 टक्के, मुंबई दक्षिण – 52.15 टक्के, मावळ – 59.12 टक्के, शिरुर -59.55 टक्के आणि शिर्डी – 60.42 टक्के.