Join us

शेतकऱ्यांनो, कठीण प्रसंगात आत्महत्या करु नका; कृषीमंत्र्यांनी केलं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 11:50 AM

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी दिवाळीत राज्यातील शेतकऱ्यांना बोलवून त्यांचा सत्कार करून कर्जमाफी केल्याचे प्रमाणपत्र दिले.

मुंबई - राज्यात सध्या पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थितीचं संकट शेतकऱ्यांवर उभं राहिलं आहे. कृषिसंकट राज्यावर ओढावलं आहे ही खरी परिस्थिती आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित रक्कम येणाऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे असा दावा राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे. 

तसेच मान्सून नसल्याने शेतकऱ्यांवर कठीण वेळ ओढावली आहे. या संकटाचा सामना आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे केला पाहिजे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र सरकारने यशस्वीरित्या कर्जमाफी योजना राज्यात राबविली आहे.

त्यामुळे दुष्काळाच्या संकटावर मात करत असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मनामध्ये आत्महत्येची भावना आणू नका असं आवाहन कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केले. 

दरम्यान सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी दिवाळीत राज्यातील शेतकऱ्यांना बोलवून त्यांचा सत्कार करून कर्जमाफी केल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र त्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. त्याचे पुरावे आम्ही सभागृहात दिले आहे. महाराष्ट्र सरकार ज्या शेतकरी कर्जमाफीसाठी स्वत:ची पाठ थोपटून घेते ती संपूर्ण कर्जमाफीच फसवी असल्याचे दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

तर दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची भेटही घेण्यात आली होती. 

टॅग्स :शेतीअनिल बोंडेशेतकरीशेतकरी आत्महत्यादुष्काळ