मुंबई : हाफकीनच्या औषध निर्माण महामंडळासाठी विविध जीवन रक्षक लस व औषध निर्माण करण्याकरता राज्य शासनाकडून १००कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली. हाफकीन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेसाठी अत्याधुनिक अशी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हाफकीनच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट, हाफकिनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर, सदस्य डॉ. आनंद बंग आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हाफकीन ही संस्था औषध निर्मिती व संशोधनाचे काम करते. या संस्थेमार्फत विविध जीवन रक्षक लस व औषधांवरील संशोधन मोठ्या करण्यात येते. संस्थेकडून करण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण कामाला गती यावी त्याचप्रमाणे योग्य प्रकारे संशोधनास चालना मिळावी म्हणून डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. स्थापन करण्यात आलेल्या या समितीने यासंदर्भात केलेल्या विविध शिफारशींचे आज सादरीकरण करण्यात आले. हाफकिनमध्ये सर्पदंशावरील लस व त्यावरील संशोधन तसेच साथीच्या रोगावरील लसीचे संशोधन करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा व इतर सुविधांची आवश्यकता असल्याचेडॉ. माशेलकर यांनी सांगितले.