ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 05:57 AM2020-09-29T05:57:05+5:302020-09-29T05:57:18+5:30
सूचना, हरकती मागवल्या : राज्य सरकारची नियमावली तयार
मुंबई : कोरोनामुळे सात महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील रेस्टॉरंट व बार आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबत राज्य सरकारने तयार केलेली नियमावली हॉटेल व्यावसायिकांना मान्य असून याबाबत सरकारने सूचना, हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर अंतिम नियमावली तयार होईल, अशी माहिती आहार संघटनेने दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. सरकारची मार्गदर्शक तत्वे संबंधितांना पाठवली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. सहा महिन्यांच्या अबकारी करातून सूट देण्याबाबत सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अटींचे पालन बंधनकारक
रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने सर्व हॉटेल व्यावसायिक संघटनांना ‘एसओपी’ पाठविला असून त्यात अनेक अटी आणि शर्थी आहेत.
कोरोनाची लक्षणे नसणाऱ्यांच प्रवेश
ग्राहकांची तपासणी करावी लागणार
विनामास्क
ग्राहकांना प्रवेश नाही
बाटलीबंद पाणी
हॅण्ड सॅनिटायझर अनिवार्य
जेवणाचे बिल डिजिटल मोडने अदा करावे
दोन टेबलामध्ये एक मीटर अंतर हवे
पार्टिशन आवश्यक
कोरोना काळात मोठे नुकसान झाले असून सरकारने मदत देऊन बार आणि रेस्टॉरंट चालकांना दिलासा देण्याची मागणी आम्ही केली होती. त्याला सरकारने संमती दर्शविली आहे. तसेच रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू करावे अशी आमची मागणी होती, त्याला होकार मिळाला आहे.
- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष ‘आहार’ संघटना