मुंबई सेंट्रल, सीएसएमटीवर लवकरच अत्याधुनिक विश्रामगृह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:00 AM2019-03-28T03:00:14+5:302019-03-28T03:00:46+5:30
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद अशा सहा ठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृहे उभारण्यात आलेली आहेत.
- कुलदीप घायवट
मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही तासांसाठी विश्रांती करता यावी याकरिता अत्याधुनिक विश्रामगृह (एक्झिक्युटिव्ह लाउंज) पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उभारण्यात येणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद अशा सहा ठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृहे उभारण्यात आलेली आहेत. अहमदाबाद येथील अत्याधुनिक विश्रामगृह नुकतेच प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीच्या वतीने मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी या स्थानकांवर अत्याधुनिक विश्रामगृह उभारण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून दोन्ही स्थानकांवर अत्याधुनिक विश्रामगृहांची उभारण्यात येईल, असे आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी सांगितले.
प्रवाशांना काही कालावधीसाठी स्थानकावर काम असते. त्यामुळे काही तासांच्या कालावधीसाठी बाहेर हॉटेल बुकिंग करण्यापेक्षा प्रवाशांसाठी अत्याधुनिक विश्रामगृहांच्या रूपात सोईस्कर जागा आयआरसीटीसीकडून उपलब्ध करून देण्यात येईल. या विश्रामगृहांत प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ, टीव्ही, वर्तमानपत्र, मासिक, रेल्वेचे अपडेट आदी सर्व सुविधा उपलब्ध असतील.
किमान दोन तास विश्रांती घेणे शक्य
रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात एकूण ३ हजार चौरस फुटांच्या जागेवर अत्याधुनिक, आरामदायी, आलिशान अशा विश्रामगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रवाशांना येथे किमान दोन तासांची विश्रांती घेता येईल. या ठिकाणी एका वेळी ६० जण आराम करू शकतील अशी व्यवस्था असेल. हवेशीर जागा, प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या, वायफाय, खाद्यपदार्थ, टीव्ही, स्वच्छतागृह यासह वामकुक्षी घेण्याची सोय, स्मोक डिटेक्टर अशा विशेष सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल, असे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.