दहशतवादी कुरेशीविरोधात राज्यात चार गुन्हे दाखल, राज्य एटीएस घेणार ताबा : तपासासाठी पथक दिल्लीला होणार रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:32 AM2018-01-23T03:32:43+5:302018-01-23T03:33:11+5:30
मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीर (४६)विरुद्ध राज्यात ४ गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन गुन्हे हे मुंबईतील आहेत. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या गुन्ह्यांचा तपास करत आहे. यापैकी एक गुन्हा निकाली लागला आहे. अन्य तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी लवकरच त्याचा ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला तौकीर बॉम्ब बनविण्यात तरबेज आहे. त्याचे कुटुंब मुंबईतच वास्तव्यास आहे. कुटुंबीयांसोबत संपर्क तोडून तो नेपाळमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे लपून होता. नवी मुंबईतील भारती विद्यापीठातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा घेतला. त्याने मायक्रो इंडक्शन, सॉफ्टवेअर मेंटेनन्सचेही प्रशिक्षण पूर्ण केले. १९९५ ते २००५ दरम्यान खासगी कंपन्यांसह भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशनमध्येही त्याने नोकरी केली.
तौकीर १९९८मध्ये ‘सिमी’त दाखल झाला होता. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दिनचा तो संस्थापक सदस्य झाला. तेथूनच त्याने सभा घेण्यास सुरुवात केली.
दोन्ही संघटनांमध्ये तरुणांची भरती, संघटनेबाबत प्रचार करणे, टेरर फंडिंग गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. पायधुनी परिसरातील सभेविरोधात यूएपीए कायद्यान्वये १९९८ साली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २००१मध्ये कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. २००६ साली सिमीचा नेता सफदार नागोरी याच्यासह सिद्दिकी आणि अन्य आठ जणांसोबत उज्जैन येथे बैठक घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात फिरोज पठाणच्या ग्रुपच्या पुणे येथे झालेल्या सिमीच्या बैठकीप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने गुन्हा दाखल केला आहे.
या तिन्ही गुन्ह्यांप्रकरणी मुंबई पोलिसांसह राज्य एटीएस अधिक तपास करत आहे. या प्रकरणी महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच लवकरच या गुन्ह्यांंच्या चौकशीसाठी कुरेशीचा ताबा राज्य एटीएस घेणार आहे. कुरेशीच्या चौकशीसाठी राज्य एटीएसचे एक पथक दिल्लीला रवाना होणार आहे.
मुंबईसह राज्यात झाडाझडती-
मुंबईसह राज्यातील अन्य दहशतवादी स्वरूपाच्या गुन्ह्यांत त्याचा समावेश असण्याची शक्यता एटीएसला आहे. कुरेशीच्या अटकेनंतर राज्य एटीएसने मुंबईसह राज्यभरात झाडाझडती सुरू केली आहे. प्रत्येक संशयित हालचालीवर ते लक्ष ठेवून आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.