राज्य बँकेकडून शासनाला १० कोटींचा लाभांश, कर्जवाटपात १३.२६ टक्क्यांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:19 AM2017-11-03T01:19:26+5:302017-11-03T01:19:44+5:30
राज्य बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. राज्य शासनाचे या बँकेत १०० कोटी रुपयांचे भागभांडवल असून बँकेने लाभांशापोटी १० कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
मुंबई : राज्य बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. राज्य शासनाचे या बँकेत १०० कोटी रुपयांचे भागभांडवल असून बँकेने लाभांशापोटी १० कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
बँकेच्या १०६व्या सर्वसाधारणसभेत सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये ४५ टक्के वाढ होऊन त्या १६,३७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. बँकेच्या कर्जवाटपात १३.२६ टक्क्यांची वाढ झाली असून या वर्षांत १६,३३६ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. बँकेने ४२४ कोटी रुपयांचा ढोबळ तर २४५.२७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून १४.५६ टक्के इतके सीआरआर गाठले आहे. बँकेने कोल्हापूर, नाशिक, पुणे, धुळे, नांदेड, बीड व सोलापूर या जिल्ह्यांत सात नव्या शाखा सुरू केल्या आहेत.
राज्य बँकेने शासनाच्या भांडवलापोटी सलग पाच वर्षे लाभांश दिला असून २०१३-१४ आणि २०१६-१७ अशी सलग चार वर्षे १० टक्के लाभांश, असा एकूण ४७ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.