नामांकित महाविद्यालयातील प्रवेशात राज्य मंडळाचे विद्यार्थी पडणार मागे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:05 AM2021-04-16T04:05:47+5:302021-04-16T04:05:47+5:30
तज्ज्ञांना भीती; अकरावी प्रवेशासाठी नवीन फॉर्म्युला ठरविण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्यार्थी ...
तज्ज्ञांना भीती; अकरावी प्रवेशासाठी नवीन फॉर्म्युला ठरविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई अशा इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. यंदा एकीकडे सीबीएसईने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना नेमक्या कोणत्या निकषावर हाेणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी कठीण होणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांत सहज प्रवेश मिळतात आणि स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडतात. यंदा सीबीएसईची परीक्षा रद्द होऊन त्यांच्याच अंतर्गत पद्धतीने मूल्यांकनाच्या पद्धत ठरवली जाणार असल्याने सर्वच विद्यार्थी सरसकट पास होणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या वर्षी राज्यातून सीबीएसईचे जवळपास ७० हजार विद्यर्थी परीक्षा देणार होते. या विद्यार्थ्यांमुळे राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा देणाऱ्या १६ लाख विद्यार्थ्यांना आणि त्यातून उत्तीर्ण होऊन अकरावीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाचे माेठे आव्हान असेल. समान न्याय मिळावा यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर उत्तीर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळ तज्ज्ञांशी चर्चा करत असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यास अकरावी प्रवेशावर ताण येणार असल्याने प्रवेशासाठी नवीन फॉर्म्युला ठरविण्याची मागणी तज्ज्ञांकडून हाेत आहे.
* अकरावी प्रवेशाच्या जागांवर ताण?
यंदा राज्यात ६ विभागीय मंडळात अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी एकूण १ हजार ६०२ महाविद्यालयांत मिळून तब्बल ५ लाख ५९ हजार ३४४ जागा उपलब्ध होत्या. सीबीएसई, आयसीएसई, आयबी, राज्य शिक्षण मंडळ या सर्व मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केल्यास अकरावी प्रवेशावर माेठा ताण येण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यातील बरेच जरी विविध प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमासाठी गेले तरी मोठा वर्ग हा अकरावी प्रवेशासाठीच्या प्रतीक्षेत असेल. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाच्या जागा अपुऱ्या पडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
* दहावीचे एकूण विद्यार्थी (शैक्षणिक वर्ष २०२०-२१)
सीबीएसई ७०,२४७
राज्य शिक्षण मंडळ १६,९९,०१९
* विद्यार्थीकेंद्रित निर्णय घ्यावा
अकरावी प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असते. गुणच नसतील तर प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकते. कोविडमुळे उद्भवलेली परिस्थिती ही शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी प्रयोग करण्याची उत्तम संधी आहे. मात्र, पुस्तककेंद्रित निर्णय न घेता विद्यार्थीकेंद्रित निर्णय शिक्षण विभागाने घ्यायला हवा.
- वैशाली बाफना, शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)
-----------------------------