मुंबई/नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबर रोजी होणार असून, त्याचदिवशी संबंधित मंत्र्यांना खात्यांचे वाटपही केले जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्रीछगन भुजबळ यांनी बुधवारी नाशिक येथे दिली. मात्र, काँग्रेसकडून मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसला खातेबदल हवा असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी २८ नोव्हेंबर रोजी शपथ घेतली. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र, काँग्रेसच्या यादीचा घोळ अजून संपलेला नाही. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी संभाव्य नावांवर चर्चा केली असली तरी पक्षश्रेष्ठींनी अद्याप त्यास मंजुरी दिलेली नाही.काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, पशुसंवर्ध व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन ही खाती आली आहेत. काँग्रेसने प्रारंभी उपमुख्यमंत्री पदावर दावा सांगितला होता, मात्र त्याऐवजी विधानसभा अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे. ग्रामीण भागाशी संबंधित असलेले ग्रामविकास अथवा सहकार खाते मिळावे यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत, तर गृहमंत्री पदासाठी राष्टÑवादी काँग्रेस आग्रही असल्याचे समजते. मात्र, खाते वाटप यापूर्वीच ठरले असून त्यात आता कोणताही बदल होणे नाही, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यांने सांगितले. खाते वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री पद अथवा गृह खात्यासाठी राष्टÑवादी अडून असल्याची चर्चा मी केवळ वर्तमानपत्रातून वाचतो आहे, असेही त्यांनी सांगितले.‘शिवभोजन’ बचत गटांकडून शिवभोजन योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची जागा संस्थांना दिली जाणार नाही. कारण याबाबतचा मागचा अनुभव चांगला नाही. बचत गटांना ही कामे दिली जातील. त्यासाठी दररोज सुमारे ५०० जणांना जेवण देणे बंधनकारक असेल.शहरी भागात ४० रुपये तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान सरकारमार्फत दिले जाईल. या योजनेच्या देखरेखीसाठी वेगळे पथकदेखील तयार करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.