मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला असून दिवाळीपूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराचा धमाका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पितृ-पंधरवडा असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली. यापूर्वीही मंत्रिमंडळ विस्ताराची अनेकदा चर्चा झाली, विशेष म्हणजे रावसाहेब दानवेंनीही याबाबत बोलून दाखवल होते. पण, अद्याप मुहूर्त लागला नाही.
आगामी निवडणुकांपूर्वी काही नव्या चेहऱ्यांना संधी तर पक्षातील नेत्यांना खुश करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वीचा मुहूर्त ठरल्याचे समजते. कारण, गणेशोत्सवानंतर पितृ-पंधरवडा असल्याने मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिवाळी अगोदरचा कालवधी उचित असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच काहीं नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले, त्यामुळे त्यांची जागा सध्या रिक्त आहे. तर भाजपकडे मंत्रिपदाच्या एकूण 4 जागा रिक्त आहेत. त्यामुळे या जागांवर नवख्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. तर राज्य सरकारलाही 4 वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन काहींना नारळ देण्यात येणार असल्याचेही समजते. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकनाथ खडसेंची वापसी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, खडसे यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून मंत्रिपदाच्या माध्यमातून खडसेंच्या मनातील खदखद दूर केली जाऊ शकते.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही हा विस्तार झाला नाही. भाजपच्या कोट्यातील 4 जागा रिकाम्या आहेत. या जागी काही नव्या चेहऱ्यांना संधी देत आगामी निवडणुकांसाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येऊ शकते.