कोव्हॅक्सिनच्या उपलब्धतेसाठी राज्याचे केंद्राला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:55+5:302021-05-11T04:06:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लसीकरणासाठी नागरिकांची केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. दुसरीकडे पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरणासाठी नागरिकांची केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. दुसरीकडे पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नाही. महाराष्ट्राला लसींचा नवीन साठा मिळाला आहे; पण त्यात कोव्हॅक्सिनच्या फक्त ३६ हजार लसी आहेत. त्यामुळे आता राज्याच्या आरोग्य खात्याने केंद्र सरकारला पत्र लिहून ५.५ लाख नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले आहे. तसेच या लसींचा साठा देण्याची मागणी केली आहे.
कोविशिल्ड लसींचे ७.०३ लाख डोस मिळाले आहेत. यामुळे आणखी तीन दिवस लसीकरण सुरू ठेवता येईल. लसींच्या कमतरतेमुळे रविवारी ६७ टक्क्यांनी लसीकरण कमी झाले. १८ ते ४४ वयोगटासाठी महाराष्ट्राला ३.५ लाख कोविशिल्ड लसींचे डोस मिळाले आहेत. तर, लसीच्या दुसऱ्या साठ्याआधी महाराष्ट्राला सीरमकडून १ मेपासून सुरू होणाऱ्या मोहिमेसाठी ३ लाख लसींचा साठा मिळाला होता.
सीरमने मे महिन्यात १३.५ लाख डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. नवीन स्टॉकमुळे सध्या ज्या गतीने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे, त्याच गतीने लसीकरण होत राहील. कोव्हॅक्सिनची लस अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे जे काही डोस मिळतील, त्याचा वापर दुसऱ्या डोससाठी होईल, असे राज्याचे अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
......................................