मुंबई: मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशात अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हा घटक कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
मुंबईतील प्रदुषणाच्या विषयावर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात माहिती दिली. हवेचं, पाण्याचं प्रदुषण कमी करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येईल, त्या राज सरकार करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. कुठलीही तडजोड करणार नाही, मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकार करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असून, मुंबईकर नागरिकांना ताप, खोकला या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर ठोस उपाययोजना व्हायला हवी. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारात वाढ व्हायला हवी. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे मुंबईतील रिफायनरी, खत कारखाने बाहेर पाठविण्याची मागणी केली असल्याची बाब मांडली.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. लाँगटर्म उपाययोजना करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस बेस्टसाठी खरेदी करण्यात आल्या आहेत. मेट्रोचे काम वेगाने सुरू केले आहे. त्यामुळे ३० टक्के प्रदूषण कमी होणार आहे. प्रदूषण असले तरी ते धूलिकणांचे आहे. विकासकामे सुरू असल्याने धूळ होत असून, ज्या-ज्या ठिकाणी धूळ सुरू होते त्या-त्या ठिकाणी पाणी मारणे तसेच अशा ठिकाणी धूळ ॲब्झॉर्ब करणाऱ्या मशीन कम्पल्सरी करण्याचा प्रयत्न आहे.फॉगिंगच्या इन्स्ट्रुमेंट महापालिका खरेदी करीत आहे. बेकरीमध्ये लाकडे जाळणाऱ्या ठिकाणी, स्मशानभूमीच्या ठिकाणी सीएनजी आणण्याचा विचार करीत आहोत. ही सर्व खरेदी महापालिकेमार्फत केली जात आहे. डम्पिंग ग्राउंडवरही या मशीन बसवल्या जातील, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले.