मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना वित्तपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बँकेने सलग चौथ्यावर्षी नफा नोंदवला आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेले सर्व निकष बँकेने पूर्ण केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला ३६९ कोटींचा नफा झाल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
बँकेच्या स्थितीविषयी, प्रगतीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले सर्व निकष राज्य सहकारी बँकेने पूर्ण केले आहेत. बँकेला मागील आर्थिक वर्षात ३६९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्या आधीच्या वर्षात हा नफा ३२५ कोटी रुपये होता. त्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने थकहमीपोटी ३०४ कोटी दिले होते. यंदा बँकेला राज्य सरकारकडून ५०० कोटी येणे आहे पण कोरोना काळामुळे बँकेला तो देण्यात आला नाही. तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नफ्यात जवळपास १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेचे एनपीए प्रमाण १.२ टक्क्यांवर आले आहे. बँकेने राज्य सरकारला गेल्या आठ वर्षांपासून दहा कोटींचा लाभांश आणि सामाजिक बांधिलकी निधीतून पाच कोटी दिल्याचे अनास्कर यांनी सांगितले.
देशभरातील बँकांनी ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. मात्र, राज्य बँकेने वरिष्ठ नागरिकांच्या ठेवींवर एक टक्का अधिक व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत असल्याने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्या आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे शक्य होत नाही.
चार वर्षांत अडचणीतील बँका सावरतील
या कर्जाची वसुली आणि इतर सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा बँकांवर असेल. शिवाय शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठाही सुरळीत होईल. या माध्यमातून चार वर्षांत अडचणीतील बँका सावरतील, असे अनास्कर म्हणाले. राज्य सहकारी बँकांचा कर्जपुरवठा शंभर टक्के कृषी क्षेत्रावर आधारित आहे. साखर कारखान्यांना ५० टक्के कर्ज राज्य सहकारी बँका देतात. राज्य सहकारी बँक भविष्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.