लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-श्रेया निमोणकर या महिलेची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करताना तिच्या मुत्र नलिकेला कायम स्वरूपी इजा केल्याने डोंबिवलीच्या डॉ सीमा शानभाग आणि नवी मुंबईचे डॉ उज्वल महाजन यांना राज्य ग्राहक आयोगाने साडे अठ्ठावीस लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी लोकमतला ही माहिती दिली.
या प्रकरणातील बाधित रुग्ण आणि तक्रारदार श्रेया निमोणकर यांच्या गर्भाशय काढण्याच्या एप्रिल २०११ मधे केलेल्या शस्त्रक्रियेच्या वेळी डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या दोन्ही मूत्रनलिकांना इजा झाली. त्यामुळे दुसरी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन एक कृत्रिम मुत्राशय बनवून त्यात दोन्ही मूत्रनलिका सोडण्यात आल्या आणि त्याचे तोंड बेंबीच्या जवळ उघडण्यात आले. त्यामुळे आता आयुष्यभर त्यांना कुंचबणा करण्यासारखी विचित्र परिस्थिती सहन करावी लागणार आहे. या संबंध प्रकरणात श्रेया निमोणकर यांना त्यांची नोकरीसुद्धा गमवावी लागली.
दोन्ही डाॅक्टरांनी त्यांच्यावर केलेला हलगर्जीपणाचा आरोप नाकारला होता आणि त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची मतेसुद्धा त्या पुष्ट्यर्थ जोडली होती. परंतु श्रेया निमोणकरांतर्फे दोन तज्ञ डॉक्टरांनी साक्ष देऊन आरोपी डाॅक्टरांचा हलगर्जीपणा उघडकीस आणण्यात सहाय्य केले.
राज्य आयोगाचे डॉ. काकडे आणि श्री. शिरसाव यांच्या खंडपीठाने सर्व साक्षी पुरावे लक्षात घेऊन या आरोपी डाॅक्टरांना वैद्यकीय हलगर्जीपणा बाबत दोषी धरुन साडे आठ्ठावीस लाखांची नुकसानभरपाई श्रेया निमोणकर यांना एक महिन्याच्या अवधीत देण्याचा महत्वपूर्ण आदेश दिला आहे असे अँड.शिरीष देशपांडे यांनी सांगितले. श्रेया निमोणकर यांची बाजूने पूजा जोशी -देशपांडे यांनी मांडली तर आरोपी डाॅक्टरांची बाजू अँड. डॉ गोपीनाथ शेणाॅय यांनी मांडली.