Join us

राज्याचा सायबर विभाग होमगार्डच्या खांद्यावर; ४ महिन्यांत सायबर भामट्यांकडून १२८ कोटींची लूट

By मनीषा म्हात्रे | Published: June 10, 2023 10:36 AM

मनुष्यबळाच्या अभावामुळे होमगार्डच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत यंत्रणा सुरू ठेवण्याची वेळ सायबर विभागावर ओढवली आहे.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे आव्हान सायबर पोलिसांपुढे असतानाच या भामट्यांनी महाराष्ट्रात गेल्यावर्षी तब्बल ५०० कोटींच्या रकमेवर डल्ला मारला आहे. तर, यावर्षी एप्रिलअखेरपर्यंत १२८ कोटींची लूट केली आहे. दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना मात्र राज्य सायबर विभागाला तपासासाठी पोलिस बळच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे होमगार्डच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत यंत्रणा सुरू ठेवण्याची वेळ सायबर विभागावर ओढवली आहे.

राज्यात एकूण ४९ सायबर पोलिस ठाणे आहेत. तर, महाराष्ट्र सायबर विभाग हा एक नोडल एजन्सी म्हणून काम करतो. विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांच्या नेतृत्वात सध्या सायबर पोलिस काम करत आहेत.  राज्यभरात गेल्या वर्षी सायबरचे ५,९०३ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी अवघ्या ५८९ गुन्ह्यांची उकल होत, १,९९६ आरोपींना अटक केली आहे. सायबर गुन्हेगारांचा पसारा वाढत असताना शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक सोयी- सुविधांच्या अभावामुळे तपासाला अडचणी येताना दिसत आहे. 

राज्याच्या सायबर विभागाला तपासाला पोलिस मिळत नसल्याने त्यांनी तरुणाईला हाताशी धरून फौज तयार करण्यास सुरुवात केली. सायबर गुन्ह्यात आवड असलेल्या तरुणाईला प्रशिक्षण देत त्यांच्यामार्फत तपास सुरू केला. खासगी व्यक्तींना तपासात प्रवेश नको म्हणून सुरुवातीला त्यालाही विरोध  झाला. मात्र, पुन्हा या तरुणांना हाताशी घेत काम सुरू झाले. तपासाला पोलिस मिळत नसल्याने त्यांनी १०० होमगार्ड तरी द्या म्हणत पाठपुरावा सुरू केला. गेल्या महिन्यात ५७ होमगार्ड रुजू झाले. त्यांनाच प्रशिक्षण देत सायबर विभागाच्या हेल्पलाइनची धुरा त्यांच्या हाती सोपविण्यात आली आहे. जवळपास १० ते १२ हेल्पलाइनवर हे होमगार्ड तीन शिफ्टमध्ये ऑन ड्युटी २४ तास कार्यरत आहे. तसेच, तपासालाही त्यांची मदत होताना दिसत आहे.

अवघ्या २० दिवसांत वाचले एक कोटी ९३ लाख  

राज्य सायबर विभागाची हेल्पलाइन २४ तास सुरू झाल्यामुळे २० मे ते आतापर्यंत एक कोटी ९३ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम सायबर विभागाने गोठवली आहे. अपुऱ्या मनुष्यबळावरदेखील सायबर विभाग चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे.

मुंबई आघाडीवर 

- गेल्या चार  महिन्यात राज्यभरात मुंबईत सर्वाधिक एक हजार ४१७ गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे.

- यामध्ये फसवणुकीची रक्कम ६६ कोटी २८ लाख, १७ हजार ८४७ आहे. 

- त्यापाठोपाठ पुणे आणि ठाण्याचा क्रमांक लागतो. पुण्यात ९२ गुन्हे नोंद असून २० कोटी पाच लाखांची फसवणूक झाली आहे. 

- तर, ठाणेमध्ये ११५ गुन्हे नोंद असून सात कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सायबर पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

 

टॅग्स :सायबर क्राइम