मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात होणाऱ्या कंत्राटी भरतीवरुन राजकारण तापलं आहे. कंत्राटी भरतीवरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरलं होतं. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातही कंत्राटी भरती झाली. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली.
राज्यातील तरुणांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न, राज्याला अराजकताकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं महाराष्ट्र सरकार तरुणांच्या पाठीशी उभं आहे. ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. आम्ही यांचा चेहरा उघडा पाडला आहे. आज अनेक विषय आहेत. मी यानंतर देखील पत्रकार परिषद घेणार आहे. अनेक विषयांमध्ये यांना मी उघडं पाडणार आहे. कारण यांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राचं खूप नुकसान झालं आहे. मात्र तरीही हे लोक तोंडवर करुन आमच्यावर आरोप करणार असतील, तर यांचा बुरखा मला फाडावाच लागेल, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिला.