Join us

मेट्रोवरून उफाळला राजकीय वाद

By admin | Published: March 18, 2016 2:55 AM

भाजपासाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या मेट्रो प्रकल्प-३च्या प्रस्तावात मित्रपक्ष सेना व विरोधकांनी खो घातल्यामुळे पक्षाचे नेते खवळले आहेत़ शिवसेना व विरोधी पक्षानेही त्यास प्रत्युत्तर

मुंबई : भाजपासाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या मेट्रो प्रकल्प-३च्या प्रस्तावात मित्रपक्ष सेना व विरोधकांनी खो घातल्यामुळे पक्षाचे नेते खवळले आहेत़ शिवसेना व विरोधी पक्षानेही त्यास प्रत्युत्तर दिल्याने मेट्रोचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत़कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो प्रकल्प-३चा प्रस्ताव शिवसेनेने विरोधी पक्षाच्या मदतीने पालिका महासभेत फेटाळून लावला़ यामुळे महापालिकेची आगामी निवडणूक स्वतंत्र लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाची गोची झाली आहे़ ‘करून दाखविले’ म्हणणाऱ्यांनी मेट्रोचा विरोध करून भाजपाची नाही, तर ट्राफिकमध्ये गुदमरलेल्या मुंबईकरांची कोंडी केली आहे, असा टोला अ‍ॅड़ आशिष शेलार यांनी लगावला आहे़ पालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी कितीही विरोध झाला तरी मेट्रो धावणारच, अशी घोषणा केली़ भाजपाच्या या भूमिकेचा शिवसेना व काँग्रेस पक्षानेही समाचार घेतला आहे़ मेट्रो विरोध नाही, पण मेट्रोमुळे बेघर होणारा गिरगावातील मराठी माणूस, ऐतिहासिक हुतात्मा चौकाची जागा आणि वृक्षांच्या संवर्धनाला प्राधान्य द्या, हीच आमची मागणी असल्याचे भाजपाला सुनावले आहे़ मेट्रो प्रकल्पाच्या वादामुळे पालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)हा विरोध लोकांच्या हितासाठीच आहे़ गिरगावमधील रहिवासी, आरे कॉलनीतील वृक्ष आणि हुतात्मा चौक येथे प्रकल्पात जाणारी जागा, हे प्रश्न प्राधान्याने सोडवा, असे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सांगितले. सुधार समितीमध्ये विरोधी पक्षांबरोबर युती करून मेट्रोचा प्रस्ताव मंजूर करणाऱ्या भाजपाची ही युती तेव्हा अभद्र नव्हती का, हा विरोध गिरगावातील मराठी माणसासाठी आहे़ - तृष्णा विश्वासराव, सभागृह नेत्या़