Join us

राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले यांचे नाव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले. त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले यांचे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त नुकतीच देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, महाराष्ट्रच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबे, त्यांचे सहकारी, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आदी उपस्थित होते.

केशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकारांसाठी राज्य पुरस्कार सुरू करण्याबाबत सरकार विचार करेल. मात्र, तत्पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, महाराष्ट्रने याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव, मार्गदर्शक तत्वे याबाबतची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबतही विचार करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांची सरकारी पातळीवर जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम करण्यात यावेत, याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येईल. संगीतसूर्य केशवराव भोसले कला, साहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल, असेही आश्वासन देशमुख यांनी दिले.