राज्य निर्बंधमुक्त, मात्र मंत्रालयात बंधने कायम; जनताजनार्दनाला अजूनही मंत्रालयात प्रवेश नाहीच, कुत्री अन् मांजरांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:30 AM2022-04-11T06:30:37+5:302022-04-11T06:30:50+5:30

संपूर्ण राज्य कोरोना निर्बंधामधून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने ज्या मंत्रालयात बसून घेतला, त्याच मंत्रालयात सामान्य माणसाच्या प्रवेशावरील बंधने आजही कायम आहेत.

State free from Restrictions but Restrictions in Ministry people not had permission | राज्य निर्बंधमुक्त, मात्र मंत्रालयात बंधने कायम; जनताजनार्दनाला अजूनही मंत्रालयात प्रवेश नाहीच, कुत्री अन् मांजरांचा सुळसुळाट

राज्य निर्बंधमुक्त, मात्र मंत्रालयात बंधने कायम; जनताजनार्दनाला अजूनही मंत्रालयात प्रवेश नाहीच, कुत्री अन् मांजरांचा सुळसुळाट

Next

मुंबई :

संपूर्ण राज्य कोरोना निर्बंधामधून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने ज्या मंत्रालयात बसून घेतला, त्याच मंत्रालयात सामान्य माणसाच्या प्रवेशावरील बंधने आजही कायम आहेत. गृह विभागाने यापूर्वी दोनवेळा ही बंधने हटविण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला, पण तो प्रलंबित आहे. 

अभ्यागतांना दुपारी २ नंतर त्यांच्या ओळखपत्रावर प्रवेश देण्याची संगणकीकृत व्यवस्था कोरोना निर्बंधापूर्वीपर्यंत होती. सर्वसामान्यांना गार्डन गेटकडून प्रवेश दिला जायचा. त्यासाठी अभ्यागतांचा फोटो काढून पास तयार केला जात असे. ही पद्धत बंद करण्यात आली, तेव्हापासून सामान्यांचे मंत्रालयात येणे-जाणे बंद झाले. मंत्रालयातील सामान्यांची वर्दळ जवळपास संपली. नंतर हळूहळू तुरळक लोक मंत्री वा मंत्री कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ओळखीने प्रवेश मिळवू लागले.

कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवायचे आणि मंत्री कार्यालयातून प्रवेश मॅनेज करायचा, असे सुरू झाले. हल्ली हा प्रकार इतका वाढला आहे की, मंत्रालय सुरक्षा यंत्रणेची डोकेदुखी फारच वाढली आहे. राज्यातील सर्वच सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी कोणतीही बंधने आता नसताना मंत्रालयातच मनाई कशासाठी, असा सवालही केला जात आहे.  गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मंत्रालय सुरक्षा यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभ्यागतांच्या प्रवेशाची पूर्वीची पद्धत सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

कुत्री, मांजरे बहू झाली
मंत्रालयात कुत्री आणि मांजरांचा सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक माळ्यावर त्यांचा मुक्तसंचार असतो. बरेच कर्मचारी त्यांना खाऊपिऊ घालतात. कुत्री-मांजरांना मंत्रालयाबाहेर घालविण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच आहे. काही कुत्री कायम मुख्य पोर्चमध्येच असतात.

माणसं आत आणण्यातच जातो मंत्री कार्यालयाचा वेळ
मंत्री कार्यालयातील कर्मचारी सध्या बाहेरून माणसांना आत आणण्याच्या कामातच व्यग्र असतात. मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांसाठी पास तयार करून घ्यायचा, गेटवर जायचे आणि त्यांना आत आणायचे, यातच त्यांचा वेळ जातो. बरेचदा लोक मंत्री कार्यालयातून कुणी येऊन घेऊन जाईल म्हणून तिष्ठत उभे असतात.

Web Title: State free from Restrictions but Restrictions in Ministry people not had permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.