मुंबई - राज्यात सध्या मंत्रिपदाच्या खातेवाटपाची जोरदार चर्चा आहे. भाजपा-शिवसेना सरकारमधील अनेक आमदारांनी मंत्रिपदाची अपेक्षा असतानाच, अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे, मंत्रिपदाची शर्यत अधिकच तीव्र झाली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या काही आमदारांना बुधवारी मुंबईला बोलावण्यात आले होते. मात्र, अजित पवारांच्या दिल्ली वारीनंतर हा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. त्यातच, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केलंय. उद्याच, हा विस्तार होईल, असे त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर आणि खातेवाटपावर साधकबाधक चर्चा वरिष्ठ नेत्यांनी केलेली आहे. त्यामुळे, आपल्यासारख्या नेत्यांनी त्यावर चर्चा करायचं काहीच कारण नाही. पण, मीडियावाले उगीचच बॅनरलाईन करतात. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? ह्या आपल्या चर्चा चालू असतात. चला मी सांगतो, उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, हे ठामपणे सांगतो, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं ठामपणे भाकीत केलं आहे.
ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असतात. पण, लगेच संजय शिरसाट बोलले उद्या विस्तार होणार आहे, अशी बातमी होते. पण, ज्यांच्या हातात हे आहे, त्यांनी तो निर्णय जाहीर करू द्या ना. आम्हाला ते वाटतं, आमचं एक कॅल्क्युलेशन असतं. जसं की उद्याचा एकच दिवस आहे. कारण, परवा चहापानाला बोलावतील पुन्हा रविवार सुट्टी असून सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे, असे म्हणत शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर आपली भूमिका मांडली. दरम्यान, पुन्हा पुन्हा मी सांगतो की मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही शिरसाट यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले. दरम्यान, संजय राऊत यांच्यावर यावेळी टीकाही केली.
विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. दरम्यान, सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून तत्पूर्वी विस्तार होणार असल्याची चर्चा होती. पण, अजित पवारांच्या दिल्ली वारीनंतर आता अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याचे समजते. त्यामुळे, शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कारण, शिंदे गटातील काही नेते मंत्रिपदासाठी गुडग्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आमदार भरत गोगावले आणि आमदार संजय शिरसाट हे सातत्याने मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होईल, असे विश्वासाने सांगत आहेत.