६०,७०६ बाटल्या रक्त संकलनाबद्दल राज्य शासनाकडून ‘लोकमत’चे अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 05:26 AM2021-09-16T05:26:14+5:302021-09-16T05:26:57+5:30
महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षात आगळावेगळा विक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जात, पंथ, धर्म, पक्ष, पद या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाराष्ट्रातील रुग्णांशी ‘रक्ताचं नातं’ जोडण्याकरिता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदान मोहिमेच्या यशाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘अभिनंदन प्रमाणपत्र’ देऊन ‘लोकमत’चा गौरव करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांना हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
‘लोकमत’ची मातृसंस्था ‘नागपूर लोकमत’ ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने आणि ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. २ जुलै रोजी या मोहिमेची सुरुवात झाली आणि २७ जुलै रोजी तिची सांगता झाली. राज्याचा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, राज्य रक्त संक्रमण परिषद तसेच विविध संघटना यात सहभागी झाल्या होत्या. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत होता; त्याचवेळी कोरोनाच्या भीतीपोटी लोक रक्तदानासाठी बाहेर पडायला तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ समूहाने ही मोहीम हाती घेतली होती.
महाराष्ट्रात ६०,७०६ लोकांनी रक्तदान करीत आगळावेगळा विक्रम निर्माण केला. संकटकाळी धावून जाण्याची महाराष्ट्राची परंपरा, या मोहिमेने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आपण अभिनंदन करतो, असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मोहीम राबवून महाराष्ट्र रक्ताच्या बाबतीत अडचणीत असताना ‘लोकमत’ धावून आल्याबद्दल विशेष कौतुक केले. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या मोहिमेमुळे राज्यात कोरोनाच्या काळात रक्तदानाविषयी निर्माण झालेली भीती दूर होण्यास मदत झाली. ‘लोकमत’ने राज्यभर या मोहिमेच्या निमित्ताने रक्तदानासाठी जनजागृती केली त्याचा मोठा फायदा झाल्याचेही सांगितले.
या मोहिमेत सहभागी होत ‘रक्ताचं नातं’ जोडण्यासाठी प्रत्येकाने मोलाचे योगदान दिले, अशी भावना व्यक्त करून रक्तदानामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे हे यश असल्याचे मत लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग नोंदविला. त्याबद्दल मी त्या प्रत्येकाचे ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो, असे सांगून विजय दर्डा म्हणाले, देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेला शुभेच्छा तर दिल्याच; शिवाय ही मोहीम राबविणे किती आवश्यक आहे हेदेखील सांगितले. ‘लोकमत’ने ही मोहीम हाती घेतल्याबद्दल त्यांनी ‘लोकमत’चे भरभरून कौतुक केले. रक्ताची गरज पडणाऱ्या प्रत्येकाशी ‘लोकमत’ने या मोहिमेच्या निमित्ताने ‘रक्ताचं नातं’ जोडले आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या छोटेखानी समारंभास अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मी तर मास्कवाला मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
प्रमाणपत्र देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘आपण फोटोसाठी मास्क काढाल का?’ अशी सूचना उपस्थितांपैकी एकाने केली; तेव्हा ठाकरे म्हणाले, ‘माझा बिनामास्कचा फोटो पाहिला, तर मला कोणी ओळखणारच नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून मी मास्क घालूनच फिरत आहे. मास्क असलेला फोटो पाहिला तरच मला लोक ओळखतात!’ मुख्यमंत्री असे म्हणाले आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला!