Join us

‘समाजभान जोपासणारा मार्गदर्शक नेता हरपला’; र. ग. कर्णिक यांना मान्यवरांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 4:35 AM

कर्णिक यांनी १९७० आणि १९७७ मध्ये झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपाला यश येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडतानाचा आक्रमकपणा आणि संयम यांचा संगम त्यांच्या नेतृत्वात होता.

मुंबई : कामगार-कर्मचारी चळवळीत न्याय हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखणे महत्वाचे असते हा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस, ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली वाहिली.महाराष्ट्राला चळवळींचा इतिहास आहे. यात कामगार-कर्मचारी चळवळीचा इतिहास लिहिताना कर्णिक यांच्या कर्मचारी संघटनेच्या उभारणीची दखल निश्चितच घेतली जाईल. संघटना पक्षातीत ठेवणे आणि गरज पडल्यास समाजाच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची शिकवण यापुढेही मार्गदर्शक ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.कर्णिक यांनी १९७० आणि १९७७ मध्ये झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपाला यश येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडतानाचा आक्रमकपणा आणि संयम यांचा संगम त्यांच्या नेतृत्वात होता. या विषयीच्या आठवणींना अनेकांनी आज उजाळा दिला. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, आ.कपिल पाटील, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सह निमंत्रक विश्वास उटगी आदींनी श्रद्धांजली वाहिली.र. ग. कर्णिक यांच्या निधनाने सरकरी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी धडाडीने लढणारा एक समर्पित नेता आपण गमावला आहे.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.कर्णिक यांच्या निधनाने कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा बुलंद आवाज हरपला आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री.एक अलौकिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दु:ख व्यक्त करायला शब्द नाहीत. लाखो कर्मचारी आज पोरके झाले. - विश्वास काटकर, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनालाखो कर्मचाऱ्यांसाठी छत्रछाया असलेले कर्णिक यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. - ग. दि. कुलथे, प्रमुख सल्लागार, राजपत्रित अधिकारी महासंघ.सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम र.ग. कर्णिक यांनी केले.  - आमदार कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारतीमहाराष्ट्रातील चळवळींचे नेतृत्व करणारे र.ग. कर्णिक यांनी सर्वसामान्य जनतेच्या उद्धाराचं व्रत घेतले होते. - विश्वास उटगी, सहनिमंत्रक, कामगार संघटना