मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने पुण्यात बालाजी स्वायत्त विद्यापीठ आणि नागपुरात रामदेव बाबा स्वायत्त विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ही दोन्ही विद्यापीठे स्वयंअर्थसाहाय्यित असतील. ही विद्यापीठे २०१९-२० या वर्षापासून सुरू करण्यात येतील. श्री बालाजी सोसायटी पुणे यांच्या माध्यमातून पुण्यातल्या विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विधि हे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत.
स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मॉडर्न मॅनेजमेंट, टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. श्री रामदेव बाबा सार्वजनिक समिती नागपूर यांच्या माध्यमातून या विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विषयाचे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत.
स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विदर्भातील उद्योगांसाठी मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने जिओ-टेक इंजिनीअरिंग, हिट पॉवर इंजिनीअरिंग, एनर्जी मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येतील. या दोन्ही विद्यापीठांत सामाजिक आरक्षणासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के जागा आरक्षित असतील. या बैठकीत विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव विधान मंडळासमोर सादर करण्याच्या विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली.