Join us

अलिबाग, एलिफंटा बेटापर्यंतचा प्रवास सुखकर होणार; कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 5:49 PM

बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई: दक्षिण मुंबईतील रेडियो स्टेशनजवळ २०१६ साली प्रस्तावित असलेल्या जेट्टी व प्रवासी टर्मिनलला राज्य सरकारने मंजुरी दिली असून यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच प्रकल्पाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यसंवर्धन व बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी २ वर्षांचा असून या प्रकल्पाला वित्त विभागाकडून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून लवकरच निविदा मागवण्यात येतील व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नवीन जेट्टी उभी राहिल्यानंतर अलिबाग आणि एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटी नवीन जेट्टीमधून धावतील. येथे एक वेटिंग रूम आणि आधुनिक सुविधांसह एक नवीन टर्मिनलदेखील असेल, अशी माहिती शेख यांनी दिली.महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकल्पासाठी भारतीय नौदल, तटरक्षकदल, पुरातत्व विभाग-मुंबई, मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण या सर्व संस्थांच्या परवानग्या मिळाल्या असून ही जेट्टी रेडिओ क्लबपासून सुमारे 200 मीटर अंतरावर बांधण्यात येईल. नवीन टर्मिनल इमारतीत पार्किंगही असेल. या जेट्टीमध्ये एकूण आठ धक्के असतील. नौका मालकांसाठी एक धक्का राखीव असेल.गेटवे ऑफ इंडियावर वर्षाला २६ लाखांपेक्षा अधिक जण नौका सफारीसाठी येतात. दरवर्षी ही संख्या १० टक्क्यांनी वाढते. याचा विचार करता सध्याची जेट्टी अपुरी पडत आहे, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आली. नव्या टर्मिनल इमारतीमध्ये ५,०५० चौरस फुटांचे प्रतीक्षालय, १०० लोकांसाठी आसनव्यवस्था व एकाच वेळी १००० जणांना सामावून घेण्याची क्षमता असेल. नव्या जेट्टी व टर्मिनलमुळे रायगड व एलिफंटाकडे पर्यटकांचा ओघ वाढेल व पर्यटनास चालना मिळेल. या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या असून प्रकल्पाचा आराखडादेखील तयार असल्याने प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.