मुंबई - केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राज्य सरकारने शिफारस केलेल्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. पण, त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले जाणार आहे.
राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं. संजय राऊत यांनाही पद्म पुरस्कारने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दिली असून इतर 97 व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कारासाठी नाकारले आहे. संजय राऊत यांच्यासह विविध मान्यवरांचा या यादीत समावेश होता. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे नाव पद्मविभूषणसाठी पाठविले होते. मात्र, महाराष्ट्रातून कोणालाही हा पुरस्कार मिळालेला नाही, तर सिंधुताई सपकाळ, ‘सिरम’चे अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या सप्टेंबरमध्येच केंद्राकडे पाठविण्यात आली होती. पद्मश्रीसाठी खा. संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, मधुकर भावे यांच्यासह 88 नावांची शिफारस राज्याकडून केली गेली होती.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नावाची शिफारस महाविकास आघाडीसरकारने केली होती. राजकीय क्षेत्रातील केवळ 2 ते 3 जणांची नावे सरकारने सूचवली होती, त्यामध्ये विद्यमान खासदार असलेले एकमेव नेते संजय राऊत आहेत. त्यांसोबतच, कै. राजारामबापू पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, केंद्राने राजकीय नेत्यांपैकी एकाही व्यक्तीची शिफारस मान्य केली नाही.
पद्मश्रीसाठी शिफारस केलेली नावे अशी होती
मारुती चितमपल्ली, अनिरुद्ध जाधव, प्रकाश खांडगे, विजया वाड, सदानंद मोरे, शिवराम रेगे (मरणोत्तर), शं.ना. नवरे (मरणोत्तर), दीपक मोडक, विठ्ठल पाटील, शंकरराव काळे (मरणोत्तर), लक्ष्मीकांत दांडेकर, यशवंतराव गडाख, राधेश्याम चांडक, निरजा बिर्ला, राजश्री पाटील, धनंजय दातार, प्रभाकर साळुुंखे, उदय कोटक, विलास शिंदे, शशिशंकर (रवी) पंडित, उदय देशपांडे, प्रभात कोळी, खाशाबा जाधव (मरणोत्तर), अंजली भागवत, अजिंक्य राहाणे, युवराज वाल्मीकी, शंकर नारायण, स्मृती मानधना, वीरधवल खाडे, अशोक हांडे, रोहिणी हत्तंगडी, आरती अंकलीकर टिकेकर, अश्विनी भिडे देशपांडे, विठाबाई नारायणगावकर (मरणोत्तर), सत्यपाल महाराज, ऋतिक रोशन, रघुवीर खेडकर, सुबोध भावे, प्रेमानंद गजवी, अशोक पत्की, अनिल मोहिले (मरणोत्तर), दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, राणी मुखर्जी, उद्धवबापू आपेगावकर, नागराज मंजुळे, गौतम राजाध्यक्ष (मरणोत्तर), रणवीरसिंग, मोहन जोशी, अशोक सराफ, राजदत्त, ऋषी कपूर (मरणोत्तर), अजय-अतुल, मुक्ता बर्वे, विक्रम गोखले, डॉ. अमोल कोल्हे, मिलिंद गुणाजी, पंडित अजय पोहनकर, जॉनी लिवर, डॉ. दुरू शहा, डॉ. ऋतुजा दिवेकर, मीनल भोसले, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. चित्तरंजन पुरंदरे, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. राहुल पंडित, डॉ. सुरेश भोसले, डॉ. मुफझल लकडावाला, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रतीत समदानी, डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. सुलतान प्रधान, अफरोज शहा, दिनू रणदिवे (मरणोत्तर), मधुकर भावे, एकनाथ ठाकूर (मरणोत्तर), जयंत बर्वे, संजीव उन्हाळे, आभा लांबा, विजयसिंह थोरात, गुलाबराव पाटील (मरणोत्तर), संजय राऊत, दीपक साठे (मरणोत्तर), हंसा योगेंद्र, रमाकांत कर्णिक.