मुंबई: राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावीत, यासाठी ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. संचालक मंडळाच्या या मागणीनंतर राज ठाकरेंनी तात्काळ शिक्षणमंत्री उदय सामंत याच्याशी संपर्क साधत सर्व मुद्दे मांडले होते. यानंतर २ दिवसात ग्रंथालय सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही उदय सामंत यांनी राज ठाकरेंना दिली होती. यानंतर राज्य सरकारने राज ठाकरेंना दिलेला शब्द पुन्हा पाळल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये उद्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र ग्रंथालये सुरु करताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहेत. उच्च तंत्र आणि शिक्षण विभागाकडून याबाबतचे SOP जारी करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
तत्पूर्वी, पुस्तके ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात याची आवश्यकता आहे. सरकारने लवकरात लवकर वाचनालये सुरू केली पाहिजेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेले अर्थचक्र गतिमान होईल, असं मत संचालक मंडळाने राज ठाकरेंसमोर मांडले होते. संचालक मंडळाच्या या मागणीनंतर राज ठाकरेंनी तात्काळ शिक्षणमंत्री उदय सामंत याच्याशी संपर्क साधत सर्व मुद्दे मांडले होते. यानंतर २ दिवसात ग्रंथालय सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही उदय सामंत यांनी राज ठाकरेंना दिली होती.
दरम्यान, मनसेकडे सत्ता नसतानाही कोरोना संकट काळात आपले विविध प्रश्न घेऊन आतापर्यंत अनेक संघटनेच्या लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामध्ये जिम चालक-मालक, थिअटर चालक-मालक, सलून व्यावसायिक, हॉटेल मालक-चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरेंनी देखील तात्काळ संबंधित मंत्र्यांशी बोलून अनेक प्रश्न मार्गी लावले होते.