China Coronavirus : अफवांविरोधात राज्य सरकारने घेतली गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 07:39 PM2020-02-20T19:39:53+5:302020-02-20T19:43:42+5:30
चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, असे बरेच मेसेज सोशल मीडियावरही फिरत आहेत.
मुंबई - चिकन खाल्यामुळे कोरोनो होतो, अशी अफवा पसरवणारे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत. या अफवेविरोधात राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती अर्थात अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अफवेमुळे पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.
काही अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं केदार यांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. दरम्यान सोशल मीडियावर याबाबत अनेक अफवांना पेव फुटले आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जग भयभीत झाला आहे. भारतातल्या लोकांनी पूर्वसुरक्षा म्हणून अगदी चिकन, अंडी खाणंही सोडले आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म आणि शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला होता. चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, असे बरेच मेसेज सोशल मीडियावरही फिरत आहेत. पण ही फक्त अफवा असल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत नाही, असे केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं होतं की, 'चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना व्हायरस हा एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होतो आहे. चिकन खाल्ल्याने कोणत्याही व्यक्तीला कोरोना व्हायरस झालेला नाही.