पाश्चात्त्य संगीतातील बारकावे सांगत दिली शुल्कमाफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:42 AM2021-02-09T02:42:24+5:302021-02-09T02:44:37+5:30
मायकल जॅक्सन शो प्रकरणावर पडदा; ‘विझक्राफ्ट’चे ३.३३ कोटी रुपये शासनाकडून माफ
मुंबई : जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सन याच्या १९९६ मध्ये मुंबईत झालेल्या शोवर आकारण्यात आलेले ३ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये इतके करमणूक शुल्क व अधिभार अखेर माफ करण्यात आला आहे. विझक्राफ्ट एंटरटेन्मेंट कंपनीला ही शुल्कमाफी देणारा आदेश महसूल विभागाने सोमवारी काढला. या आदेशात शासनाने पाश्चात्य संगीतातील बारकावे नमूद करीत शुल्कमाफीचे समर्थन केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी महसूल विभागाने काढलेल्या आदेशात, ‘पॉप म्युझिकचा उगम ‘रॉक ॲण्ड रोल’ या संगीत प्रकारातून झालेला आहे, तर बीट म्युझिकमध्ये रॉक ॲण्ड रोल संगीत प्रकाराच्या स्टाईलचा समावेश आहे. त्यामुळे पॉप म्युझिक व बीट म्युझिक हे दोन्ही संगीत प्रकार एकमेकांशी सुसंगत आहेत. त्यावरून मायकल जॅक्सनच्या शोचा संगीत प्रकार हा बीट म्युझिकचाच भाग असल्याचे दिसून येते. तसे मायकल जॅक्सनचा पॉप शो हा संगीताचा प्रकार कॅब्रे अथवा बॉल डान्स या संगीत नृत्याच्या प्रकारात मोडत नाही. मायकल जॅक्सनच्या त्या शोमध्ये बॉल डान्स वा कॅबरे नृत्य प्रकाराचा समावेश नसल्याने, शासनाच्या पूर्वीपासूनच्या निर्णयानुसार हा कार्यक्रम करमणूक शुल्कमाफीस पात्र ठरतो,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवउद्योग सेनेतर्फे १ नोव्हेंबर, १९९६ रोजी मायकल जॅक्सन कॉन्सर्ट झाली होती. त्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता.