...तर सर्वांसाठी चालू होणार मुंबई लोकल; फॉलो करावा लागणार 'चेन्नई पॅटर्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 01:45 PM2021-01-12T13:45:01+5:302021-01-13T19:07:45+5:30
मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. यानंतर गर्दी नसलेल्या वेळेत महिलांना प्रवासाची परवानगी देण्यात आली. यानंतर आता सर्व प्रवाशांसाठी लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी चेन्नई पॅटर्न वापरला जाऊ शकतो.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चेन्नई उपनगरीय रेल्वेनं तीन टप्प्यात प्रवाशांना मुभा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात विना गर्दीच्या वेळेत महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबर २०२० रोजी घोषित केलेल्या तिसऱ्या टप्प्यात गर्दी नसलेल्या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.
चेन्नई रेल्वेच्या धर्तीवरच मुंबई लोकलमध्ये सर्वप्रथम अत्यावश्यक व त्यानंतर विनागर्दीच्या वेळेत महिलांना प्रवासमुभा देण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात चेन्नई पॅटर्नप्रमाणे महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेत प्रवास मुभा देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईतील कार्यालयांच्या वेळेत बदल केलेला नाही. यामुळे मर्यादित वेळेतील लोकल असून नसल्यासारखी असेल. यामुळे लोकलमुभा देऊनही प्रवासाची मूळ समस्या 'जैसे थे' राहील. यामुळे अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला. यामुळे सर्वांसाठी लोकल खुली या पर्यायाचादेखील समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतील यावर लोकल प्रवास अवलंबून आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
मुंबई लोकल प्रवासाचे पर्याय-
१. महिलांना पूर्ण वेळ
२. सामान्य प्रवाशांना गर्दी नसलेली वेळ
३. सर्वांसाठी पूर्ण वेळ
४. रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सामान्य प्रवाशांना