Join us

पालिकेच्या उद्यानांसाठी राज्य शासनाचा पैसा; सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 10:13 AM

तीन उद्याने, एक मैदान पर्यटन विभागाच्या पैशातून सुशोभित होणार.

मुंबई : मुंबईतील उद्याने, बाग-बगीचे यांची निर्मिती, सुशोभिकरण आणि सुविधावाढ हा मुंबई महापालिकेचा विषय असताना राज्याच्या पर्यटन विभागाने पवईतील विविध उद्यानांसाठी घेतलेला विशेष रस चर्चेचा विषय बनण्याची चिन्हे आहेत. पवई आणि चांदिवली परिसरातील तीन उद्याने आणि एका मैदानाचे सुशोभिकरण करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने जवळपास चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी काही रक्कम तातडीने वितरितही केली आहे. 

ही तीनही उद्याने आणि मैदान उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील असून त्याचे प्रतिनिधित्व  पूनम महाजन करतात. राज्याच्या पर्यटन विभागाचे मंत्री गिरीश महाजन हेही भाजपाचेच आहेत हा आणखी एक योगायोग आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत हा निधी मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येत असून त्यासाठी त्यांनी कार्यान्वयन यंत्रणा नियुक्त करायची आहे. म्हणजेच मुंबई महापालिकेला भूमिका बजावता येणार नाही.  पर्यटन विभागाच्या या शासन निर्णयातून आचारसंहिता जाहीर होण्याआधी घाईने विकास प्रकल्पांच्या अर्थकारणाची चक्रे फिरताना दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून या प्रस्तावावर घाईघाईने निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जाते. 

या उद्यानांचे होणार सुशोभीकरण :

अटलबिहारी वाजपेयी उद्यान, रामबाग परिसरातील उद्यान, रहेजा उद्यान व गणेश मैदान, म्हाडा कॉलनी चांदिवली यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी उद्यानात संगीत कारंजी विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ९० लाख रुपये दिले जात आहेत. रामबाग आणि रहेजा उद्यानाचे सुशोभिकरण एक कोटी रुपये खर्चून केले जाणार आहे. मैदानाचे सुशोभिकरण करण्यासाठीही निधी मान्य झाला आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका