Join us

निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक -मंत्री अस्लम शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांत सवलत देण्याची मागणी व्यापारी वर्गाने लावून धरली आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांत सवलत देण्याची मागणी व्यापारी वर्गाने लावून धरली आहे, तर लोकल प्रवासाची मुभा मिळावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले तरी शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचा दावा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.

कोरोना निर्बंधांतून हॉटेल, कापड उद्योगासोबतच व्यापारी वर्गाला कशा प्रकारे सुविधा द्यायच्या यावर सरकार विचार करत असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा केंद्र सरकारकडून मिळत नसल्यामुळे अनलॉकचा निर्णय पूर्णपणे अमलात येऊ शकत नसल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे.

राज्याला लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे; पण केंद्राकडून लसीचा पुरेसा साठा मिळत नाही. खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध होते. मात्र, सरकारी रुग्णालयांना लस मिळत नाही. देशातील भाजपशासित राज्यातही अशीच स्थिती आहे. केंद्र सरकारचा नियोजनशून्य कारभाराचा फटका बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.