मुंबई : एसटीमधील चालक, वाहक, यांत्रिकी आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन ७ एप्रिलला झाले नाही. पगार कधी होईल, अशी चिंता कर्मचाऱ्यांना सतावत होती. मात्र राज्य सरकारकडून सवलतीमधील शिल्लक ३०० कोटी रुपयांपैकी एसटी महामंडळाला 150 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होणार आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला ७ तारखेला पगार होतो. मात्र ७ एप्रिलला फक्त अधिकाऱ्यांचे पगार झाले होते. त्यामुळे देखील कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर धरला होता. मात्र, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी एसटी महामंळाकडे निधी नसल्याने राज्य सरकारकडे सवलतीचे शिल्लक असलेले 300 कोटी रूपये देण्याची मागणी होती. त्यावर राज्य सरकारने 150 कोटी रुपये एसटी महामंडळाला देऊ केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्याने एसटी कामगार संघंटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदने पाठवून वेतन देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे सवलतीचे शिल्लक असलेले 300 कोटीची मागणी केली. त्यावर राज्य सरकारकडून १५० कोटी देण्यात आले आहेत. मात्र हे पैसे मिळाल्यावर एक ते दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी पुढील आठवड्यात कर्मचार्यांना वेतन मिळेल.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार एसटी महामंडळाकडून विविध प्रवासी वर्गाला प्रवासी तिकीट दरात सवलती दिल्या जातात. २०१९-२०२० या वर्षातील कालावधीतील सवलतीच्या दराची काही रक्कमेची महामंडळाला दिली जाते. काही रक्कम प्रवासी करामधून घेतली जाते. या कालावधी मधील १५० कोटींची रक्कम महामंडळाला देण्यात आली आहे.
----------------------------------
परिवहन मंत्री व एस टी महामंडळचे अध्यक्ष अनिल परब यांचे आभार व्यक्त करतो. कोरोनाच्या संकटात व राज्य आर्थिक अडचणीत असताना त्यांनी विशेष प्रयत्न करून ही रक्कम तात्काळ महामंडळाकड़े वर्ग होण्यासाठी प्रयत्न केले.- श्रीरंग बरगे , सरचिटणीस , महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कॉंग्रेस
----------------------------------
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतींच्या मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी १५० कोटी रूपये राज्य सरकारने दिले आहेत. परंतु, गुड फ्रायडे, शनिवार व रविवार या दिवशी बँका बंद असल्याने सोमवारी, १३ एप्रिल रोजी एस.टी. कर्मचा-यांचे वेतन जमा होईल.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)