मुंबई तुंबल्यास राज्य सरकार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:42 AM2018-05-17T01:42:47+5:302018-05-17T01:42:47+5:30
मेट्रोच्या कामामुळे शहरातील पर्जन्य जलवाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्या फुटल्या आहेत.
मुंबई : मेट्रोच्या कामामुळे शहरातील पर्जन्य जलवाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्या फुटल्या आहेत. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पर्जन्य जलवाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्या दुरुस्त केल्या नाहीत, तर त्याचा परिणाम पावसाळ्यात जाणवू शकतो. त्यामुळे मुंबई तुंबली, तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसरमधील नदी-नाल्यांचा दौरा केला. या वेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विविध प्रभाग समिती अध्यक्ष, उपायुक्त, नगरसेवक, सहायक आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान असे दिसून आले की, मुंबईत आतापर्यंत ५० टक्केच नालेसफाई झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
बी.के.सी. ब्रिज आणि इर्ला नाल्याच्या सफाईचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत मुंबईतली नालेसफाई ५० टक्के झाली आहे. येत्या काही दिवसांत नाल्यांची ७० टक्के सफाई होईल, असे महापौरांनी दौºयादरम्यान म्हटले. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. वांद्रे पूर्वेकडील महाराष्ट्र नगर येथील ज्ञानेश्वर नाल्याचे काम अद्याप महापालिकेने सुरू केलेले नाही. ज्ञानेश्वर नाल्याच्या बाजूने अनधिकृत बांधकाम व झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी सगळा कचरा नाल्यात टाकतात. परिणामी, वेळेत नालेसफाई झाली नाही, तर ज्ञानेश्वर नाला पावसाळ्यात ओव्हरफ्लो होईल. वाकोला नदीमध्येही सफाईचे काम सुरू केलेले नाही. याबाबत महापौरांनी ठेकेदारांना नोटिसा पाठविणार असल्याचे सांगितले.
।...तर ठेकेदारांवर कारवाई करू
नालेसफाई ही फक्त महापालिकेची जबाबदारी नसून, नागरिकांचीसुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे कचºयाबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महापालिका स्वत:चे काम व्यवस्थितरीत्या करीत आहे. काही नाल्यांची सफाई अद्याप ठेकेदारांनी सुरू केलेली नाही. येत्या दहा दिवसांत पुन्हा नालेसफाईचा पाहणी दौरा होणार आहे. तोपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण झाले नाही, तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असे महापौर म्हणाले.