Join us

राज्यातील ७९ हजार कुपोषित बालकांना राज्य सरकारने दत्तक घ्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यभरातील ७९ हजार कुपोषित बालकांना दत्तक घेऊन येत्या सहा महिन्यांत त्यांना सुदृढ बनविण्याचा संकल्प राज्य शासनाने करायला ...

मुंबई : राज्यभरातील ७९ हजार कुपोषित बालकांना दत्तक घेऊन येत्या सहा महिन्यांत त्यांना सुदृढ बनविण्याचा संकल्प राज्य शासनाने करायला हवा, अशी सूचना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केली. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी मुंबई काँग्रेसने १ हजार कुपोषित मुलांचे पालकत्व स्वीकारले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते.

भाई जगताप यांच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेसने झोपडपट्ट्या आणि आदिवासी पाड्यांतील १ हजार कुपोषित बालकांची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी ५१ मुलांना दत्तक घेण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मंत्री यशोमती ठाकूर, अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, काँग्रेसकडून नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी रचनात्मक, सामाजिक आणि विधायक कार्यक्रम राबविले जातात. मुंबई काँग्रेसतर्फे १ हजार आणि पालकमंत्री अस्लम शेख व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वैयक्तिकरित्या १ हजार कुपोषित बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एक हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. कोरोना काळात संपूर्ण राज्यभरात ६५ हजार युनिट रक्त संकलित करत काँग्रेसने नवा आदर्श निर्माण केला आहे.

एक हजार कुपोषित मुलांना दत्तक घेण्याची केवळ घोषणा न करता, पहिल्या टप्प्यात ५१ मुलांना दत्तक घेत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या १० दिवसात उर्वरित प्रक्रिया पार पाडली जाईल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.

स्तुत्य उपक्रम - पटोले

पीडितांना मदत करून त्यांचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहा, असा संदेश काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमी देत असतात. त्या संदेशाचे अनुपालन करत मुंबई काँग्रेसने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.