मनोहर कुंभेजकर,मुंबई : कोरोनाचा हा नवीन प्रकार, JN.1, सध्या अमेरिका, चीन आणि सिंगापूरमध्ये कहर करत आहे.कोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. केरळनंतर आता आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराची पुष्टी झाली आहे. त्यामुळे नऊ दिवसांत भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत. रुग्णालयातील खाटाही भरल्या आहेत. सिंगापूरने तर लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यात पुन्हा डोके वर काढणारा नवा व्हेरिएंट JN.1 हा धुमाकूळ पुन्हा घालेल का? याचा विचार राज्य शासनाने करावा कर्नाटक राज्याने मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी यावर विचार करून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन मुंबई महानगर पालिका व पुणे महानगर पालिका सारख्या मोठ्या महानगर पालिकातून व्हावे असे आदेश द्यावेत अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॅा दीपक सावंत यांनी केली आहे . तसेच एन. आय. व्ही . पुणे याच्याशी संपर्क साधून या व्हेरिएंट विषयी अधिक माहिती व सल्ला घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
हा ओमायक्रॅानचा सब व्हेरिएंट असला तरी त्या वंशावळी प्रमाणे प्रसार क्षमता अधिक असलेला असून थंडी त्याच्या तीव्रतेत अधिक भर घालू शकते. अमेरिकेत सप्टेम्बर मधे सापडलेला केरळामधे आला. सध्या पर्यटनाचे दिवस असल्याने पर्यटकांवर त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे हे शासकीय तसेच महानगर पालिका खाजगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स , खाजगी क्लीनिक्स यावर लक्ष ठेऊन त्याचे रिपोर्टिंग व्हावे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घ्यावा असेही डॉ. दीपक सावंत यांनी सुचविले आहे
केरळनंतर महाराष्ट्र आणि गोव्यात नवीन प्रकाराची 19 प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी एक प्रकरण महाराष्ट्रातील आहे, तर 18 प्रकरणे गोव्यातील आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर 11 डिसेंबर रोजी कोरोनाचे 938 रुग्ण होते. साथीच्या रोगाच्या पुनरागमनाबद्दल केंद्राने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.