'राज्य सरकारने सलून उघडले, आता दुकानाचे भाडे अन् पॅकेजचाही निर्णय घ्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 01:28 PM2020-06-26T13:28:56+5:302020-06-26T13:30:10+5:30
राज्यातील उर्वरित भागांमध्येसुध्दा केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई - राज्य शासनाने मिशन बिगिन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून सलून दुकानदारांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे भाजपा नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले असून आणखी एक मागणी केली आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लस येत्या २८ जूनपासून सुरु करता येतील. राज्यातील उर्वरित भागांमध्येसुध्दा केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधित राज्य सरकारने अधिसूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, काही नियमावली तयार करण्यात आली असून दुकानदार आणि ग्राहकांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
सलोन आणि ब्यूटी पार्लर असो. शिष्टमंडळाच्या निवेदनाचा सहानुभूतीने विचार करून ती सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार! त्यांच्या दुकानांचे भाडे व इतर पॅकेज यांविषयीही सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.@CMOMaharashtra@OfficeofUT
— Vinod Tawde (@TawdeVinod) June 26, 2020
भाजपा नेते विनोद तावडेंनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, सरकारने सलून व्यवसायिकांच्या दुकानाचे भाडे देण्यासंदर्भातही निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. सलून आणि ब्युटी पार्लर चालकांसाठी काही विशेष पॅकेजही जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करत, भाजपा शिष्टमंडळाच्या निवेदनाचा सहानुभूतीने विचार करुन ती सुरु करण्यास परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार.. असेही तावडेंनी म्हटले आहे.
हेअर सलून आणि ब्युटी पार्लर यांना पुढील अटींवर दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे-
ग्राहक व कारागिराना मास्क अनिवार्य
दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागणार आहे.
केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येईल. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.
दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानांतील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.
फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशा वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल.
उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.