गजानन काळे यांच्याबाबत ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:53 PM2021-08-16T18:53:12+5:302021-08-16T18:53:27+5:30
गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर भाजपासह महाविकास आघाडीमधील महिला चांगल्याच आक्रमक पाहायला मिळत आहे
मुंबई: मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे पत्नी संजीवनी काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. गजानन काळेंवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर भाजपासह महाविकास आघाडीमधील महिला चांगल्याच आक्रमक पाहायला मिळत आहे. तक्रार दाखल करुन चार दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याचपार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या महिलांनी गजानन काळेंच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन केले. तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गजानन काळेंना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी देखील केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पोलीस आयुक्तांलयाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न महिलांनी केला. यावेळी त्यांना अडवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अखेर गृहमंत्र्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला भेटून परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर आता खुद्द दिलीप वळसे-पाटील यांनी गजानन काळेंना अटक करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे गजानन काळे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकाऱ्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी गोळा केले. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत असे पत्नी संजिवनी काळे यांनी सांगितलं होतं.
घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणाऱ्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अशा सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संजीवनी यांनी केल्याने गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.
काळेंचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न; पोलीसांकडून शोध सुरूच -
कौटुंबिक हिंसाचार व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत.