मुंबई - आरोग्य विभागाच्या गाईडलाईन नुसार लोकलचं मध्ये 50 टक्के प्रवाशांनी प्रवास केला पाहिजे. त्यामुळे सध्याची रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवणे गरजेचे अशी राज्य सरकारची मागणी आहे. रेल्वेची फ्रीक्वेन्सी वाढली तर आणि कोविडची परिस्थिती बघून राज्य सरकार आपला प्रस्ताव योग्य वेळी देईल अशी स्पष्टोक्ती शिवसेना प्रवक्ते,आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली.
उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दि,15 ऑक्टोबरपासून लोकल सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार प्रयत्नशील आहे असे केलेले वक्तव्य हे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून होते असे प्रभू यांनी सांगितले. दि,15 ऑक्टोबरपासून लोकल सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार प्रयत्नशील आहे,मात्र 10 दिवस शिल्लक असतानाही अजूनही तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आलाच नसल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलंय तेही योग्य आहे असे प्रभू शेवटी म्हणाले.
लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार; रेल्वेमंत्री गोयल यांनी केले होते, असे विधान
लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून मागणी करण्यात आली नाही, असे केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य सर्वांसाठी रेल्वेची सेवा बंद आहे. लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रेल्वे प्रशासनाशी यासंदर्भात सरकारचे बोलणे सुरू असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पीयूष गोयल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, अनलॉकच्या सुरू झालेल्या टप्प्यांमध्ये मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत अजून तरी कोणतीही मागणी महाराष्ट्र सरकारकडून मला प्राप्त झालेली नाही. मागणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे मुंबई लोकल नेमकी कधी सुरू होईल, याबाबत संभ्रम कायम आहे.