घरेलू कामगारांच्या पेन्शनचा हप्ता राज्य सरकार भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:19 AM2020-05-06T03:19:26+5:302020-05-06T03:19:41+5:30
राज्यातील साडेबारा लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या पेन्शनसाठीचा हप्ता बांधकाम मजूर कल्याण मंडळामार्फत भरण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे
मुंबई : राज्यातील हजारो घरेलू कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत त्यांना भराव्या लागणाऱ्या मासिक हप्त्याची रक्कम त्यांच्या कल्याण मंडळामार्फत भरण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती कामगार विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी लोकमतला दिली.
राज्यातील साडेबारा लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या पेन्शनसाठीचा हप्ता बांधकाम मजूर कल्याण मंडळामार्फत भरण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर घरेलू कामगारांबाबत लवकरच मंडळ निर्णय घेणार आहे. या योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील घरेलू कामगारांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळणार आहे. घरेलू कामगारांमध्ये अर्थातच महिलांची संख्या मोठी आहे. १८ वर्षे वयाच्या कामगारासाठी महिना ५५ रुपये तर चाळीस वर्षे वयाच्या कामगारांसाठी २०० रुपये हप्ता आहे. इतरांसाठी वयोगटानुसार हप्ते पाडण्यात आले आहेत. राज्यात १२२ प्रकारचे असंघटित कामगार असून घरेलू कामगार हा एक मोठा घटक आहे.
कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन असले तरी घरेलू कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नोंदणीसाठी कामगारांना नाव, मोबाइल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक आणि रेशनकार्डची झेरॉक्स एवढेच द्यावे लागते. मार्चपासून मुंबई व पुण्यात सहकार विभागाच्या सहकायार्ने जवळपास तीस हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली.
मुंबई विभागाचे सहनिबंधक (सहकारी संस्था) संतोष पाटील म्हणाले, पंकज कुमार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही नोंदणीचे काम सुरू केले. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेकडून घरेलू कामगारांबाबतची माहिती घेण्यात येत असून त्या माध्यमातून नोंदणीचे काम सुरू आहे.