Join us

खुल्या प्रवर्गांच्या नाराजीवर राज्य सरकारचा ‘अमृत’ उतारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 6:27 AM

खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई : शिक्षण आणि सरकारी नोकरीतील आरक्षणाचा टक्का वाढल्यामुळे नाराज असलेल्या खुल्या प्रवर्गाला चुचकारण्यासाठी राज्य सरकारने अमृत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण अमृतमार्फत दिले जाणार आहे.खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार आहे.अनुसूचित जातीतील तरुणांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सारथी ही संस्था स्थापन केली आहे. त्याप्रमाणेच बहुजन, दुर्लक्षित व वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही स्वायत्त संस्था स्थापन केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था काम करेल. तसेच कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, एमफील, तसेच पीएच.डी अभ्यासक्रमांसाठीही प्रशिक्षणाचा उपक्रम प्राधान्याने राबविला जाईल. महिलांचे सक्षमीकरण करण्यासह समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.रोजगाराला प्राधान्यतरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था प्राधान्य देईल.

टॅग्स :मंत्रालय