एसटी प्रवासामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीत कपात, राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 03:09 AM2019-06-28T03:09:21+5:302019-06-28T03:10:03+5:30
एसटी प्रवासात ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्ण प्रवासात सवलत होती. मात्र आता...
मुंबई : एसटी प्रवासात ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्ण प्रवासात सवलत होती. मात्र आता राज्य सरकारच्या ९ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी एसटी महामंडळाकडून केली जाणार आहे. नवीन स्मार्ट कार्डची योजना संपूर्ण राज्यभरात कार्यान्वत झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या सवलतीमध्ये कपात होईल. यातून एका वर्षात फक्त चार हजार किमी एसटीचा प्रवास सवलतीत करता येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किमीचा प्रवास वर्षभरात सवलतीत करण्याची मुभा आहे. यामध्ये एका दिवसात फक्त ११ किमी एसटीचा प्रवास सवलतीत करता येणार आहे. एसटीच्या नवीन स्मार्ट कार्ड अंमलबजावणीनंतर हा निर्णय राज्यात लागू होणार आहे.
राज्यातील एसटी महामंडळाने तब्बल २९ विविध सवलतींसाठी स्मार्ट कार्ड योजनेची सुरूवात केली आहे. त्यासाठी राज्यातील २५० आगारांमध्ये स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे.
एसटीच्या सवलतीच्या रक्कमेचा परतावा राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून केला जातो. एसटीच्या सवलतीत प्रवास करणाऱ्या एकूण ३८ कोटी सवलतीधारकांपैकी ३४ कोटी सवलती धारक ज्येष्ठ नागरिक आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या खिशाला आता कात्री पडणार आहे.
एसटी प्रवासात सवलत असल्याने ज्येष्ठ नागरिक एसटीतून प्रवास करतात. साध्या आणि निमआराम बसमध्ये ५० टक्के, शिवशाहीमध्ये ४५ आणि शिवशाही स्लीपरमध्ये ३० टक्के सवलत महामंडळातर्फे दिली जाते. मात्र आता सवलतीमध्ये कपात केल्याने प्रवाशांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे.