‘एसटी’च्या चाकात राज्य सरकारची हवा
By admin | Published: March 20, 2017 02:26 AM2017-03-20T02:26:03+5:302017-03-20T02:26:03+5:30
खासगी वाहन चालकांंची अरेरावी, नादुरुस्त गाड्यांमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ होत आहे. परिणामी, एसटीचा तोटा भरून
मुंबई : खासगी वाहन चालकांंची अरेरावी, नादुरुस्त गाड्यांमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ होत आहे. परिणामी, एसटीचा तोटा भरून काढत एसटी महामंडळाला संजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला आहे. शनिवारी सादर झालेल्या राज्याच्या २०१७-१८ अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची तरतूद केली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात एसटीस्थानक आधुनिकीकरणासाठी १८ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासनाकडून येणाऱ्या सलवत मूल्याची प्रतिपूर्ती म्हणून १ हजार ४०० कोटी आणि महामंडळाला भांडवली अंशदान म्हणून ५३१ कोटी इतक्याच रकमेची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एसटी महामंडळाला पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळणार असल्याने, भविष्यात एसटी प्रवाशांचा सोयीचा दर्जा वाढण्यास मदत होईल, शिवाय सरकारकडून येणे असलेल्या सवलत मूल्य मिळवण्यासाठी एसटी महामंडळाला पायपीट करावी लागणार नाही.
एसटी महामंडळाच्या तुलनेत पहिल्यांदा महामंडळासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गत अर्थसंकल्पात तुलनेत ही तरतूद भरीव असल्याचे दिसून येत आहे. सवलत मूल्य १३०८ कोटी आणि भागभांडवल ४१९ कोटी या रकमेची तरतूद होती. यावर्षी तरतुदीच्या रकमेत कोट्यवधींची वाढ झाल्याने एसटी महामंडळाला संजीवनी मिळाली आहे. (प्रतिनिधी)