लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारतर्फे पहिल्यांदाच प्रो कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील एनएससीआय संकुल येथे ३१ ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघरमधील १६ गोविंदा पथके सहभागी होणार असून, पहिले बक्षीस ११ लाख रुपयांचे जाहीर करण्यात आले आहे. दुसरे बक्षीस सात लाख रुपये, तिसरे बक्षीस पाच लाख रुपये आणि चौथे बक्षीस तीन लाख रुपये आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धा पार पडतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत तसेच क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. नियमावलीनुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाणार असून, प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिम्पिकच्या धर्तीवर मॅटचा वापर करण्यात येणार असून, गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांची मदत शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दहीहंडीला खेळाचा दर्जा
गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यावर भर राहणार असून, दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. एनएससीआय स्टेडियमध्ये ४० फूट उंची असल्याने तिथे स्पर्धा आयोजित केल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
५०,००० गोविंदांना विमा कवच
- गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आले आहे.
- यासाठी राज्यभरातील ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून, मुंबईतील २० गोविंदा पथकांतील तीन हजार ५०० गोविंदांना विम्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.