Join us

भाजपाच्या 'त्या' आमदार-खासदारांना १,२६२ कोटींचा निधी; ३२ मतदारसंघांसाठी 'स्मार्ट' प्लॅन

By यदू जोशी | Published: August 18, 2023 6:15 AM

केवळ ३२ जणांच्या मतदारसंघांमध्ये हा निधी देण्यात आला आहे. 

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघातील भाजपचे खासदार, आमदार आणि आदिवासींची मोठ्या प्रमाणात गावे, वाड्या, वस्त्या असलेल्या भाजप आमदारांच्या मतदारसंघांमध्ये रस्ते बांधकाम आणि रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल १,२६२ कोटी रुपये आदिवासी विकास विभागाकडून केवळ एक वर्षात देण्यात आले आहेत. केवळ ३२ जणांच्या मतदारसंघांमध्ये हा निधी देण्यात आला आहे. 

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. या आमदारांची एक बैठक आधीच घेण्यात आली होती व त्यांच्या मागणीनुसार या निधीचे वाटप दोन टप्प्यांत करण्यात आले. यात भाजप आणि भाजपचे सहयोगी आमदारांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. 

आदिवासी वाडे, पाड्यांना जोडण्यासाठी ५ हजार कोटी

आदिवासी भागांतील वाडे, पाडे, गावे यांना बारमाही रस्त्यांनी जोडणारी ‘बिरसा मुंडा जोडरस्ते योजना’ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेवर पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

या आमदारांच्या मतदारसंघात वाटप

५.५ कोटी ते १८ कोटी रुपयांचे वाटप ज्यांच्या मतदारसंघांत झाले त्यात संजीवरेड्डी बोदकुरवार, पंकज भोयर, महेश बालदी, मदन येरावार, दादाराव केचे, सुरेश भोळे, समीर कुणावार यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अशा आमदारांनाही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. आता राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांनाही असा निधी देण्याची कार्यवाही सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.

अधिक निधी मिळालेले खासदार, आमदार असे (आकडे कोटीत)

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार    ₹७२.०५ केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील    ₹४०.३० खा. डॉ. हिना गावित    ₹८४.८० खा. अशोक नेते    ₹३७.९२ खा. सुभाष भामरे    ₹२९.३० खा. रक्षा खडसे    ₹२०.११ आ. डॉ. संदीप धुर्वे    ₹८८.८० आ. कृष्णा गजबे    ₹८२.६७ भीमराव केराम    ₹७९.४० आ. राजेश पाडवी    ₹७६.९० आ. दिलीप बोरसे    ₹७४.८५ आ. डॉ. देवराव होळी    ₹७०.९१ आ. किसन कथोरे    ₹६५.३५ आ. डॉ. अशोक उईके    ₹६१.८७ आ. काशीराम पावरा    ₹६१.१५ आ. रवीशेठ पाटील    ₹५२.८५ आ. राहुल आहेर    ₹४२.६३ डाॅ. संजय कुटे    ₹३० आ. विनोद अग्रवाल    ₹२९.८० आ. नामदेव ससाने    ₹२८.०५ आ. राजेंद्र पाटणी    ₹२०.९१ मंत्री सुधीर मुनगंटीवार    ₹२०.५० आ. विजय रहांगडाले    ₹२०

टॅग्स :राज्य सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवार