लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणात तीन कोटींचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. शुक्रवारी दोन वाजता राज्यातील लसीकरणाने टप्पा पार केला. आतापर्यंत ३ कोटी २७ हजार २१७ लोकांना लसीची मात्रा देऊन संरक्षित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, वय वर्षे ४५ वरील लोकसंख्येनंतर आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरणात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. गुरुवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार राज्यात २ कोटी ९७ लाख २३ हजार ६३७ लसीच्या मात्रा देण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ २ कोटी ८९ लाख २२ हजार ६०५ मात्रांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होता. याशिवाय गुजरात, राजस्थान, कर्नाटक, पश्चिम बंगाल येथील लसीकरणाने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
...............................................................