मुंबई : देशातील मृत्युदर रविवारी पहिल्यांदाच २.४९ टक्क्यांवर आला असून जगात मृत्यूचे सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. एकीकडे ही आनंदवार्ता असतानाच दुसरीकडे, महाराष्ट्राचा मृत्युदर देशाच्या तुलनेत अधिक म्हणजे ३.८२ टक्क्यांवर गेल्याने या आनंदावर विरजन पडले आहे. शिवाय, राज्यात आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद रविवारी झाली. दिवसभरात ९ हजार ५१८ कोरोनाचे रुग्ण वाढले, तर २५८ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे.
राज्यात आता एकूण ३ लाख १० हजार ४५५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बळींचा आकडा ११ हजार ८५४ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत १ लाख ६९ हजार ५६९ जण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के आहे.
सामूहिक संसर्ग सुरू
देशात कोरोना विषाणूंच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली असल्याच्या इंडियन मेडिकल अससोसिएशनच्या दाव्याला दिल्लीच्या सर गंगाराम हास्पिटलच्या सेंटर फॉर चेस्ट सर्जरीचे प्रमुख डॉ. अरविंद कुमार यांनी रविवारी दुजोरा दिला. ते म्हणाले की आधी धारावीसारख्या काही वस्त्यांपुरताच सामूहिक संसर्ग मर्यादित होता, पण आता तो वाढत व पसरत चालला आहे.
३८,९०२ नवे रुग्ण
देशात एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे ३८,९०२ नवे रुग्ण आढळले. बाधितांची एकूण संख्या १० लाख ७७ हजारांवर गेली आहे. मात्र आतापर्यंत ६२.८२ टक्के म्हणजे ७ लाख ७७ हजार जण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे २६,८१६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात होणाऱ्या मृत्यंूचा दर २.४९ टक्के इतका आहे. जगभरातील अनेक कोरोना संसर्ग झालेल्या देशांपेक्षा भारताली मृत्यूदर सर्वात कमी आहे. रविवारी २३, ६७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी जाण्याची परवानगी दिली.