राज्यात कोरोना मृत्यूंमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:06 AM2020-12-08T04:06:45+5:302020-12-08T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे आहे. त्यातही मुख्यतः ६१-७० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे आहे. त्यातही मुख्यतः ६१-७० वयोगटातील अधिक व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत झालेल्या ४६ हजार ९४३ रुग्णांपैकी १३ हजार ९१६ रुग्ण ज्येष्ठ नागरिक आहेत.
राज्यातील एकूण कोरोना बळींमध्ये ८० टक्के मृत्यू हे ५०हून अधिक वयोगटातील आहेत. त्यात ६१ ते ७० वयोगटानंतर ५१ ते ६० वयोगटात ११ हजार २४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात ३ हजार ४४१ महिला रुग्ण असून ७ हजार ८०८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांचा अधिक समावेश आहे. सध्या राज्यात १८ लाख ५० हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण असून त्यात १२ लाख रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजेच हे प्रमाण सुमारे ६५ टक्क्यांइतके आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना बळींमध्ये ७० टक्के मृत्यू हे पुरुषांचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना अतिजोखमीचे आजार असलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिजोखमीच्या आजारांचे रुग्णांशी संपर्क साधून कोरोना संसर्गाविषयी माहिती विचारली जात आहे. लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
याविषयी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गाचे निदान लवकर झाल्यास उपचार प्रक्रियेत आणून हा संसर्ग नियंत्रणात आणता येतो. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही उशिराने रुग्ण उपचार प्रक्रियेत येण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू ओढावत आहे.