मुंबई : कोविडदरम्यान खंड पडलेल्या अवयवदानाने आता गती घेतली आहे. अवयवदानाच्या बाबतीत देशात अग्रेसर असलेल्या तमिळनाडूला मागे टाकत महाराष्ट्राने अग्रस्थान मिळविले आहे. काही वर्षांत अवयवदानाच्या चळवळीत महाराष्ट्राचा झेंडा अग्रेसर असेल, अशी आशा या चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
देशात यंदा राज्यात ८८ अवयवदाते मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून २४४ जणांना अवयवदान करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ७४ दाते मिळाले होते. त्यामुळे राज्याला देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. राज्यातील प्रत्यारोपणांची नोंदणी 'रोटो' या संस्थेंतर्गत केली जाते. त्याबाबत जनजागृती केली जाते. तसेच राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीचा (झेडटीसीसी) समावेश आहे.
राज्यात अवयव प्रत्यारोपणात सातत्याने पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीस) आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी ४१ अवयव दाते पुण्यात मिळाले. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले. मुंबई, नागपूर आणि औरंगाबादमध्ये अनुक्रमे ३०, १० आणि एक दाते मिळाले आहेत. त्यामुळे राज्यात पुणे आघाडीवर आहे, अशी माहिती पुणे 'झेडटीसीसी'च्या समितीने दिली. पुण्याने मुंबई, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद येथील रुग्णांना अवयव दिले आहेत.
----------------------------------------
कोट
प्रत्यारोपणाच्या परवानगीसाठी एकच स्वतंत्र यंत्रणा करायला हवी. तसे झाल्यास चळवळ अधिक वेग घेईल. अवयव प्रत्यारोपणाच्या कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने राज्याचे कौतुक केले आहे, ही सांघिक यशाची पावती आहे. त्यामुळे भविष्यात या कार्याचा मोठा विस्तार होईल, अशी आशा आहे.
- डॉ. सुजाता पटवर्धन, संचालिका, रोटो