मुंबई : राज्यात लसीच्या पुरवठ्यात अनियमितता असल्याने लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे. त्यामुळे राज्य शासन लस पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. नुकतेच राज्याला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा २१ लाख डोसचा साठा प्राप्त झाला आहे, त्यात १८.१७ लाख डोस कोविशिल्डचे आणि २.७४ लाख कोव्हॅक्सिनचे डोस आहेत.
मुंबईत आतापर्यंत ८० लाखांहून अधिक जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. शहर उपनगरात गुरुवारी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद होते; मात्र त्या दिवशी खासगी लसीकरण केंद्रांवर दिवसभरात ४१ हजार जणांना लस देण्यात आली. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकार डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, वारंवार राज्य आणि केंद्र पातळीवर लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी मागणी करण्यात येत आहे, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरण गतीने करावे लागेल.
पालिकेला तीन दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध झाला आहे. शनिवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी लसीकरण होणार आहे. मुंबई पालिकेला पुण्यातून १ लाख ७० हजार ५९० लसींचे डोस मिळाले आहेत. त्यात १ लाख ५९ हजार ७३० कोविशिल्ड, तर १० हजार ८६० कोव्हॅक्सिनच्या डोसचा समावेश आहे. पालिकेने सर्व लसीकरण केंद्रांना लसीचे डोस पुरविले असून, प्रत्येक केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.