गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार?; राजेश टोपेंनी राज्यातील निर्बंधाबाबत दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:35 PM2022-03-30T13:35:14+5:302022-03-30T13:38:36+5:30
चीन आणि इतर देशांमध्ये रुग्ण वाढल्याने कोरोनाबाबत सतर्क राहण्याची गरज आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकार हळूहळू कोरोनामुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. याचदरम्यान राज्यात मास्कमुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र मास्कमुक्तीचा विचार अद्याप केला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सणवार साजरे करताना कोरोना संदर्भातील काळजी घेऊन साजरा करा. चीन आणि इतर देशांमध्ये रुग्ण वाढल्याने कोरोनाबाबत सतर्क राहण्याची गरज आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
टास्क फोर्स व विविध संस्था या क्षेत्रात सातत्याने काम करत असतात. जगात, देशात काय चाललंय, प्रतिबंधक योजनांबाबत मार्गदर्शन करत असतं. निर्बंधांसंदर्भात मागण्या येतात. आम्ही टास्क फोर्सपर्यंत या मागण्या पोहोचवतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेत असतो. गुढी पाडव्याबद्दलचा निर्णयही त्यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
रेल्वेमधील निर्बंध लसीकरण वाढावं म्हणून कायम ठेवले आहे. रेल्वे, बस, मॉलमधील शिथीलकरणाबाबत टास्क फोर्सची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार सल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले, परदेशात कोरोनाचा धोका वाढतोय, ज्या नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी घ्यावी, तसेच मास्कमुक्तीचा सध्यातरी सरकारचा विचार नाही, तसेच मास्कमुक्तीचं धारिष्ट्य करणं तुर्त केलेले नाही, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यात मंगळवारी १०३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, तर एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच दिवसभरात १०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आता ९६० रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.